एकदा ईश्वराम्मा मला म्हणाली,” स्वामी आपले पुट्टपर्ती एक लहान खेडे आहे. आपल्या गावात शाळा नसल्यामुळे, मुलांना शाळेत जाण्यासाठी बाजूच्या गावामध्ये चालत जावे लागते. मला माहित आहे की तुम्ही करुणा सागर आहात. कृपया तुम्ही आपल्या गावामध्ये एक छोटी शाळा बांधा.'” तिला शाळा कोठे बांधायची आहे असे मी विचारले. घराच्या मागे, जमिनीचा एक तुकडा तिच्याकडे असल्याचे तिने सांगितले. तेथे तिला शाळा बांधायची होती. तिच्या इच्छेप्रमाणे मी तेथे शाळा बांधली. ती शाळा जरी खूप लहान असली तरी त्या शाळेचा उद्घाटन समारंभ अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा झाला आणि अनेक भक्तांनी त्या समारंभास हजेरी लावली. त्या उद्घाटन समारंभाविषयी आनंद व्यक्त करत, ईश्वराम्मांनी त्या गावामध्ये एक रुग्णालय सुद्धा बांधावे अशी अजून एक इच्छा व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “स्वामी, मी तुम्हाला त्रास देऊ इच्छित नाही. जर तुम्हाला त्रास झाला तर संपूर्ण जगाला त्रास होईल आणि जर तुम्ही आनंदात असाल तर संपूर्ण जग आनंदात असेल. कृपा करून येथे एक छोटेसे रुग्णालय बांधा.” तिच्या इच्छेनुसार मी एक रुग्णालय बांधले. त्या काळातील नामवंत व्यक्ती, श्री बेजवाडा गोपाल रेड्डी ह्यांना त्या रुग्णालयाचा उद्घाटनासाठी आमंत्रित केले. आजूबाजूचा गावातील हजारो लोकांनी ह्या उद्घाटन समारंभास हजेरी लावली. तो समारंभ इतक्या मोठ्या प्रमाणावर होईल अशी ईश्वराम्मांनी कल्पनाही केली नव्हती. दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली आणि म्हणाली,” स्वामी, आता मला मृत्यू जरी आला तरी हरकत नाही आता मला कशाचीही चिंता नाही माझ्या सर्व इच्छा तुम्ही पूर्ण केल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांचे दुःख कमी केले आहे.” मी तिला म्हटले, “जर तुझ्या अजून काही इच्छा असतील तर मला आता सांग.” तिची अजून एक छोटी इच्छा असल्याचे तिने संकोचून सांगितले. “तुम्हाला माहित आहे की पावसाळ्यामध्ये चित्रावती नदीला पूर येतो आणि उन्हाळ्यात मात्र ती कोरडी पडते आणि लोकांना प्यायला पाणी मिळत नाही म्हणून कृपा करून आपल्या गावामध्ये काही विहिरी खणल्या जातील असे पाहा.” मी तिला सांगितले की मी केवळ छोट्या विहिरी खणून थांबणार नाही तर संपूर्ण रायलसीमा भागास मी पिण्याचे पाणी पुरवणार आहे. ईश्वरामा म्हणाल्या, “रायलसीमा म्हणजे काय मला माहीत नाही परंतु आपल्या गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळाले तर मला समाधान वाटेल.” — बाबा
ईश्वरांबा नंदन, ईश्वरांबा प्रिय तनया, इत्यादी भजने गाऊन श्री सत्यसाई बाबांची भक्ती केली जाते.जेव्हा आपण भगवंतासाठी अत्यंत प्रेमाने आणि भावपूर्णतेने ही भजने गातो तेव्हा दिव्य माता व दिव्य अवतार यांच्यामधील सुंदर नाते संबंधाचे हे स्तुतीगान केवळ आपले हृदय आनंदाने भरून टाकत नाही तर ते भगवंताचे हृदयही आनंदाने भरून टाकते.