भज गोविन्दम्’ विषयी
ज्या परिस्थितीत हे महान काव्य शंकराचार्यांच्या मुखातून बाहेर पडले तिचे वर्णन एका आख्यायिकेत केलेले आहे. असे म्हणतात वाराणसीत एकदा आचार्य आपल्या चौदा शिष्यांसमवेत दैनंदिन फेरीला चाललेले असताना एक अत्यंत वृद्ध पंडित पाणिनीच्या व्याकरणाचे नियम घोकत असताना त्यांच्या कानात पडले. जीवनातील संध्याकालीन अत्यंत अमूल्य वेळ भगवंताचे चिंतन संसारबंधनातून मुक्तीसाठी प्रार्थना करण्यात खर्च करण्याचे सोडून केवळ एक साध्य प्राप्त करण्यात वाया घालविणाऱ्या त्या माणसाच्या अज्ञानाची व मूर्खपणाची आचार्यांना कीव आली. त्यांना हेही माहीत होते की, हीकेवळ एका विशिष्ट वृद्ध माणसाची स्थिती नाही तर बहुतेक सर्व माणसांची सामान्य अवस्था होती. अनेक (किंवा कमालीच्या) निरुपयोगी पद्धतींनी आपले जीवन वाया घालवितात; ऐहिक आसक्तींच्या चिखलात लोळत पडतात, आयुष्याचे एकमेव ध्येय असणाऱ्या देवाला विसरतात. माणसाच्य अवस्थेची दया येऊन आचार्यांना जी पद्ये स्फुरली ती ‘मोहमुद्गर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. सध्या त्याच्या धृपदातील ‘भज गोविंदम्’ या शब्दांनीच मान्यता पावलेली आहेत.
“हे अज्ञानी मूर्खा! जेव्हा तुला पकडून नेण्यासाठी मुत्यू दार ठोठावील तेव्ह ऐहिक ज्ञान) तुझी सुटका करायला येणार नाही. या निरर्थक पध्दतीने आयुष्याचा अमूल्य वेळ वाया घालविण्याऐवजी गोविंदाला शोधण्याकडे तुझा मोहरा फिरव. तोच तुला जन्ममृत्यूच्या जबड्यातून सोडवील.”
आचार्यांनी लिहिलेल्या भारतीय पवित्र ग्रंथावरील टीकांना ‘भाष्य’ म्हणतात. तुलनेत ‘भजगोविंदम ‘ हि छोटी रचना आहे. ‘आत्मबोधा’ सकट ‘भजगोविंदम’ इत्यादी ग्रंथ हे ‘प्रकरण ग्रंथ’ या प्रकारात मोडतात. प्रकरण ग्रंथ म्हणजे आध्यात्मिक अभ्यासाचे प्रास्ताविक ग्रंथ असतात. दी क्षा घेतलेल्या अध्यात्मिक साधकांसाठी तत्त्वज्ञानातील संज्ञा इत्यादीचे स्पष्टीकरण करणारे हे प्राथमिक स्वरूपाचे ग्रंथ असतात. या छोटया रचनांमधून प्राथमिक आध्यात्मिक सत्ये पुढे आणलेली असतात आणि ती माणसाला विचार करायला लावतात: “अरे! है जीवन आहे. या तुरुंगातून सुटण्याचा मला प्रयत्न केला पाहिजे. देव मला मार्गदर्शन व मदत करो!” माणूस अशा तऱ्हेने आयुष्याच्या दलदलमुक्त गल्लीबोळातून बाहेर खेचला जातो. त्या दलदलीमध्ये तो फसलेला असतो. तिथून काढून तो परमार्थाच्या राज मार्गावर आणून सोडला जातो. तोच भगवंताकडे नेणारा मार्ग असतो.
१९७३ साली वृंदावन मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय संस्कृती आणि परमार्थ’ यावर वासंतिक अभ्यासवर्ग झाला होता. त्यामध्ये भगवान श्री सत्यसाईबाबांनी त्यांच्या सायंकालीन दिव्य प्रवचनासाठी ‘भज गोविंदम्’ हाच विषय घेतला होता. त्यांनी भज गोविंदम्’ ची सोळा कडवी तेलुगूमध्ये अनुवादित करून त्यांच्या खास शैलीत मधुमधुर आवाजात म्हटली. त्यांच्या प्रवचनांनी ‘भज गोविंदम्’चा विषय उत्कृष्ट पद्धतीने विशद केला. जणू काही शंकराचार्य स्वतःच त्या पद्यांचा अर्थ विवरण करून व स्पष्टीकरण देऊन सांगत होते आणि त्यांच्या अर्थाची सखोलता दर्शनीत होते. म्हणून या विषयाच्या अभ्यासासाठी ‘वृंदावनातील वासंतिक वर्षांच – १९७३ या बाबांच्या प्रवचनांच्या संग्रहाचा उत्तम उपयोग करून घ्यावा असा सल्ला आहे. “अरे मूढमती माणसा। तू मुक्तिमती हो आणि भगवंताचा- गोविंदाचा शोध घे!” असा उपदेश करून बाबांनी या गीताचा उद्देश स्पष्ट केला.
बाबांनी प्रवचनासाठी व स्पष्टीकरणासाठी निवडलेले सोळा श्लोक पुढीलप्रमाणे होते, (तपशीलवार स्पष्टीकरणासाठी गुरूंनी ‘वृंदावनातील वासतिक वर्षाव १९७३” हा ग्रंथ पाहणे गरजेचे आहे.)