उत्सव आणि विधी
- बुद्ध जयंतीचा मुख्य उत्सव बोधगया येथे साजरा केला जातो. ह्या उत्सवात भगवान बुद्धांना आदरांजली वाहण्यासाठी, जगाच्या कानाकोपर्यातून, खूप मोठ्या संख्येने बौद्ध भक्त तेथे येतात. मंदिर आणि त्याच्या भोवतालचा परिसर रंगीबेरंगी बौद्ध ध्वजांनी सुशोभित केला जातो.
- त्या दिवशी, प्रातःप्रार्थना, भिक्षूंची विविध रंगांनी नटलेली मिरवणूक, नानाविध वस्तू समर्पित करून पूजन, मिठाई व इतर खाद्यपदार्थांचे वाटप इ. कार्यक्रम होतात.
- इतर ठिकाणी प्रार्थना, प्रवचने घराघरामधून, धार्मिक सभागृहातून आणि मठांमधून अखंड बौद्ध धर्मग्रंथांचे स्वर निनादत असतात. ह्या दिवशी बौद्धधर्मीय लोकं स्नान करून केवळ पांढरे कपडे परिधान करतात. भगवान बुद्धांच्या पुतळयाला फुले, उदबत्या, मेणबत्या, फळे अर्पण करतात. तो संपूर्ण दिवस ते भगवान बुद्धांचे जीवन चरित्र आणि त्यांची शिकवण ऐकण्यात व्यतीत करतात.
- बोधगयेतील महाबोधी मंदिरास फुलांनी आणि विविधरंगी ध्वजांनी अत्यंत सुंदर सजावट केली जाते. बोधी वृक्षाखाली (ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना आत्मज्ञान झाले.) विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातात.
- बुद्ध जयंतीच्या दिवशी, सार्वजनिक ठिकाणी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी पाणपोया उभारल्या जातात. आणि प्राण्यांना भूतदया दाखवतात.
- बुद्ध जयंती एक अत्यंत शांतीपूर्ण आणि उन्नत करणारा उत्सव आहे.
- बौद्ध दंतकथेनुसार बुद्धाची पत्नी यशोधरा, त्यांचा पहिला शिष्य आनंद, त्यांचा सारथी चन्ना आणि त्यांचा घोडा ह्या सर्वांचा जन्म बुद्ध जयंतीच्या म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिनीच झाला होता. जीवनाविषयी काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी राज्याचा त्याग केला.