प्रात्यक्षिक
ज्योती शाश्वत परमेश्वराचे प्रतिक आहे.
शक्यतो ध्यानासाठी आपण एक विशिष्ठ वेळ आणि विशिष्ठ जागा निश्चित करावी. पहाटेची ब्रह्ममूहुर्ताची म्हणजेच ४ ते ६ ही वेळ ध्यानासाठी सर्वात उत्तम आहे कारण त्या वेळेत मनाला विचलित करणारे असे काही नसल्यामुळे मन शांत आणि प्रसन्न असते तसेच शरीर ताजेतवाने असते. संध्याकाळचा वेळही ध्यानासाठी उचित आहे. समोर ऊर्ध्वगामी, संथ तेवणारी ज्योत असलेला दिवा ठेवा.
मुलांनो, सुखासनात बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा. तुमच्या समोरील ज्योतीकडे पाहा. सावकाश एका लयीत श्वास आतमध्ये घ्या आणि बाहेर सोडा. डोळे हळुवार बंद करा. थोड्या सरावानंतर डोळे मिटल्यानंतरही तुम्हाला ज्योत दिसेल. हा प्रकाश शुध्द आहे. हे ज्ञान आणि प्रज्ञा आहे
आता ही पवित्र ज्योत दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आणून सावकाश आपल्या आतमध्ये घेऊ या. प्रेमाच्या आणि सद्भावाच्या सोनेरी प्रकाशाने आपले कपाळ भरून गेले आहे
आता ती ज्योत हळुवारपणे घशातून हृदयापर्यंत, शरीराच्या मध्यभागी आणावी. साधारणतः ह्या ठिकाणी आध्यात्मिक ह्रदय असते असे मानले जाते. हे आध्यात्मिक हृदय कमळाची एक कळी आहे अशी कल्पना करा. ज्योतिचे ऊब आणि प्रकाश त्या कळीवर पडल्यामुळे एक एक करून तिच्या पाकळ्या उमलत आहेत. आता ती ज्योत कमळाच्या मध्यभागी येते. हळुहळू ते कमलपुष्प विरुन जाते. आता आपल्याकडे असलेली ही ज्ञानज्योत आध्यात्मिक हृदयाच्या गाभ्यात व सभोवताली तिचे प्रेम आणि ऊब प्रसारित करते आहे.
आता आपण ही ज्योत शरीराच्या सर्व अवयवांमध्ये फिरवून त्यांना शुध्द आणि पवित्र बनवू या. आता हा प्रकाश आपण दोन्ही डोळ्यांमध्ये आणूया. आता दिव्य प्रकाशाने डोळ्यांना व्यापून टाकले आहे. आता आपण आपल्या सभोवती फक्त चांगले (मंगल) पाहू. ज्योतीचा प्रकाश दोन्ही कानांमध्ये नेऊन त्यांना शुध्द करू. आता त्यांना भक्तिगीते, आनंददायी बोल ऐकायला आवडतील. ते कर्णकटू संगीत वा परनिंदा ऐकणार नाहीत
चांगले पाहा, वाईट पाहू नका
चांगले ऐका, वाईट ऐकू नका
चांगले बोला, वाईट बोलू नका
चांगले विचार करा, वाईट विचार करू नका
चांगले कर्म करा, वाईट कर्म करू नका
आता ही ज्योत आपण जीभेवर आणि मुखात आणू या. त्यामुळे जीभ आणि मुख शुध्द प्रकाशाने भरून जाईल. आता आपण मृदु आणि प्रेमाने बोलू या. परमेश्वराचे गुणगान गाऊ या. आपण फक्त पोषक आणि सात्विक अन्न आणि पेय घेऊ या. संपूर्ण मन प्रेमाच्या प्रकाशाने भरून जाऊ दे.
आता आपण ज्योतीचा प्रकाश दोन्ही हातांमध्ये खांद्यापासून हाताच्या बोटांपर्यंत आणू या. आपण हा प्रकाश पायांमध्ये (पायांच्या अंगठ्यांपर्यंत) आणून पायांना पवित्र प्रकाशाने भरून टाकू या. आता आपण आपल्या हातांनी जे कर्म करू, आपले पाय जेथे आपल्याला घेऊन जातील ते नेहमीच चांगले असेल. आता ती ज्योत पुन्हा आध्यात्मिक हृदयाच्या मध्यभागी आणू या.
आपले संपूर्ण शरीर दिव्य प्रकाशाने भरून गेले आहे. तुमच्या अंतर्यामी प्रेमाची ऊब अनुभवा. आता आपण हे प्रेम इतरांबरोबर वाटून घेऊ शकतो. कल्पना करा की तुमच्यामधून प्रसारित होणारा हा प्रकाश तुमचे शरीर पूर्णपणे व्यापून त्याच्या पलीकडे पसरत आहे. प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाल्याची अनुभूती घ्या. : प्रथम प्रकाश माझ्यामध्ये होता, आता मी स्वतः प्रकाश आहे.
प्रकाश तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहचू दे. – आई, वडील, भाऊ, बहिण इ. सर्वांना तुमच्या प्रेमाच्या प्रकाशात सामावून घ्या. आता हा प्रकाश तुमचे मित्र, नातेवाईक व पाळीव प्राणी ह्यांच्यापर्यंत पोहचू दे. एवढेच नव्हे तर ज्यांच्यापाशी तुमचे भांडण आहे त्यांच्यापर्यंतही तुमचे प्रेम पोहचू दे म्हणजे ते तुमचे मित्र बनतील
आता हा प्रकाश सर्वत्र पाठवून संपूर्ण जग तुमच्या प्रेमात सामावून घ्या. सर्वत्र प्रेमाची ऊब, फक्त प्रेम, शांती, आनंद अनुभवा. “तुम्ही आणि प्रकाश एक आहात” ह्याची अनुभूती घ्या. बाहेर पाठवलेला प्रकाश पुन्हा माघारी तुमच्या अंतर्यामी आणा व थोडा वेळ तेथेच ठेवा. शांती आणि प्रसन्नतेचा आनंद लुटा. आता परतीची वेळ झाली आहे. दोन्ही हात जोडा, एकमेकावर हळुवारपणे घासा आणि बंद डोळ्यांवर हात फिरवा. आता हळुहळु डोळे उघडा.
जर मुलांना हे सत्र आवडले तर त्यांना मोठ्या प्रमाणावर ऊर्जा, शांती आणि स्थिरता प्राप्त झाल्याचा अनुभव येईल. त्यांच्यासाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरेल. परीक्षेचा पेपर लिहिण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वीची प्रार्थना करताना मुलांना स्तब्ध बैठक करण्यास सांगा.