भरताचे रामासाठी झुरणे
भरताला रात्री झोप येत नव्हती. तो रामासाठी अविरत अश्रू ढाळत होता. वनामध्ये जाऊन रामाच्या चरणांवर लोटांगण घालण्यासाठी तो आतुर झाला होता.
पहाट होताच, भरत आणि शत्रुघ्न, त्यांच्या माता, कुलगुरु वसिष्ठ, मंत्रीगण, सैन्यदल व हजारो नागरिक ह्यांनी वनाकडे प्रस्थान केले.
दोन दिवस प्रवास केल्यानंतर ते गंगेच्या तीरावर पोहोचले. आदिवासी जमातीचा नायक गुह ह्याने त्या सर्वांना पाहिले व भरत सैन्य घेऊन रामलक्ष्मणाशी युद्ध करण्यास आला आहे असा तर्क केला. त्याची शहानिशा करण्यासाठी तो रामाशी साधर्म्य असणाऱ्या भरताकडे गेला. भरताचे डोळे दुःखाने लाल झाले होते. त्याने वल्कले परिधान केली होती. रामाला अयोध्येस परत घेऊन जाण्यासाठी तो वनामध्ये जात असल्याचे त्याने गुहाला सांगितले.
भरताच्या साधेपणाने व प्रामाणिक भावनेने गुह हेलावून गेला. त्याने त्या सर्वांना गंगेच्या पैलतीरी पोहचवण्याची व्यवस्था केली. तसेच भारद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन केले. ते त्या आश्रमात पोहोचले. सैन्यास त्यांनी आश्रमापासून दूर अंतरावर थांबवले. भरत, शत्रुघ्न भारद्वाज ऋषींकडे गेले. त्यांना अभिवादन करुन त्यांनी रामाला भेटण्याचा हेतू असल्याचे सांगितले. भारद्वाजांना त्यांची परीक्षा घ्यायची होती. त्यांनी त्या दोघांना विचारले, “मी रामाचा ठावठिकाणा सांगावा अशी तुमची इच्छा आहे का, म्हणजे त्याचा माग काढून तुम्ही त्याची हत्या करु शकाल?” ते ऐकून भरताला अत्यंत वेदना झाल्या. तो म्हणाला, “असा हेतू बाळगल्याचा माझ्यावर आक्षेप केला जातो, म्हणजे मी खरोखरच महापापी आहे. हे ऋषिवर, आपल्याला खरेच असे वाटते का की तो गुन्हा करण्याइतका मी खालच्या पातळीवर जाईन?”
भारद्वाज स्पष्टपणे भरताचे मन वाचू शकत होते. त्यामुळे त्यानी त्याचे सांत्वन केले आणि त्या रात्री त्यांचे भव्य आदरातिथ्य केले. परंतू भरताचे मन रामपाशी होते. त्यामुळे तो त्या मेजवानीचा मनापासून आस्वाद घेऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भारद्वाजांनी त्यांना चित्रकूटकडे जाण्याचा मार्ग दाखवला. तेव्हा राम, लक्ष्मण आणि सीतेसह चित्रकूट येथे वास्तव्यास होता. चित्रकूट येथे रामलक्ष्मणांनी मिळून एक साधी पर्णकुटी बांधली व ते तेथे आनंदाने जीवन व्यतीत करत होते. भोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहून व हिरव्यागार कुरणांमधून भ्रमंती करुन सीताही आनंदित होत होती. एकदा दुपारी ते तिघेजण एक वृक्षाखाली विश्रांती घेत असताना, त्यांच्या दिशेने येणारा एक मोठा आवाज त्यांना ऐकू आला.त्या आवाजाने पक्षी अस्वस्थ झाले. लक्ष्मणाने जवळच्या एका वृक्षावर चढून आजूबाजूला नजर टाकली. तो पटकन खाली उतरला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे बंधो! मोठे सैन्य घेऊन भरत आपल्यावर चालून आला आहे. त्याला हे इतके सोपे वाटतेय का? त्याचा अंत माझ्या हाती होणार आहे.” तो क्रोधाने उत्तेजित झाल्यामुळे त्याच्या बोलण्यात सुसंगती नव्हती. रामाने त्याला मधेच रोखून म्हटले, “लक्ष्मणा, एवढा उतावीळ होऊ नकोस. भरत कधीही इक्ष्वाकु वंशाचे नाव कलंकित करणार नाही. त्याचे माझ्यावरील प्रेम आणि भक्ती मी जाणतो. जर तुला राज्यामध्ये रस असेल तर भरताला मी ते तुला देण्यास सांगेन.”
ते शब्द लक्ष्मणाच्या हृदयाला छेदून गेले. त्याला त्याची चूक उमगली व त्याच्या वर्तनाची शरम वाटून त्याने रामाकडे क्षमायाचना केली. त्यानंतर तिघेहीजण उत्सुकतेने भरताची प्रतिक्षा करु लागले.
जेव्हा भरत दृष्टिपथात आला तेव्हा त्याची संन्याशाची वस्त्रे व दुःखाने म्लान झालेली चर्या पाहून राम हेलावून गेला. त्याने त्वरेने पुढे जाऊन भरतास आलिंगन दिले. दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहात होत्या. रामाने अयोध्येतील सर्वांच्या हिताची विचारपूस केली व राजातील सद्य परिस्थितीविषयी चौकशी केली. त्यावर भरताने विचारले, “बंधू, तू अयोध्या सोडल्यानंतर, मी राज्यकरभार चालवेन असे तुला वाटले का? आपल्या वंशामध्ये नेहमी ज्येष्ठ बंधु राज्यकारभार चालवतो आणि म्हणून राज्य चालवण्यासाठी मी तुला परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तू वनवासास गेल्यानंतर आपले प्रिय पिताश्री, आपल्याला एकाकी करुन हे जग सोडून गेले.” पिताश्रींच्या मृत्यूची खबर ऐकून रामाची शुद्ध हरपली. थोड्या वेळाने राम शुद्धीवर आला. त्यानंतर चौघही भाऊ मंदाकिनी नदीच्या तीरावर गेले व रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले.
त्यानंतर सर्वजण एकत्र बसल्यावर रामाने विचारले, “भरता, राज्य सोडून, ही संन्याशाची वस्त्रे परिधान करुन, तू येथे का आलास?” त्यावर भरत उत्तरला,” प्रिय बंधो, पिताश्रीच्या मृत्यूनंतर, धर्माने अयोध्येचा त्याग केला. माझा त्या राजसिंहासनावर काहीही अधिकार नाही. राज्यकरण्यासाठी तूच न्याय्य व्यक्ती आहेस म्हणून आम्ही सर्वजण, तू अयोध्येस परतून धर्माची पुनर्स्थापना करावीस अशी विनंती करण्यासाठी येथे आलो आहोत. माझी माता कैकयी, जिने तुला हे दुःख देण्याची योजना आखली, तिला आता पश्चाताप होतोय.”
त्यावर रामाने त्याला म्हटले, “तुमच्या सर्वांच्या माझ्यावरील प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. कैकयी मातेस वा पिताश्रींना दोष देऊ नकोस. आपण सर्वजण प्रारब्धाने बांधलेले आहोत. जे अटळ आहे त्यापुढे आपण नतमस्तक झाले पाहिजे. मी १४ वर्षे वनवासात काढावीत व तू राज्यकारभार चालवावास अशी पिताश्रींची इच्छा होती. आपण त्यांची इच्छा पूर्ण करूया. त्यांच्या आत्म्याला आनंद वाटेल.”
भरतही तेवढाच ठाम होता. तो म्हणाला, “मी तुला घेतल्याशिवाय नगरात परत जाणार नाही. माझा सिंहासनावर काहीही अधिकार नाही. म्हणून कृपा करुन, हजारो नागरिक, माता, शत्रुघ्न आणि मी आम्हा सर्वांची इच्छा पूर्ण कर.”
रामाने ठामपणे सांगितले, “माझे मत स्पष्ट आहे. आपण पिताश्रींच्या इच्छेचे पालन केले पाहिजे. त्यातून माघार नाही. पिताश्रींच्या मृत्यूनंतर प्रजेची काळजी घेणे तुझे कर्तव्य आहे. तेथे तुला शत्रुघ्न मदत करेल आणि येथे मला लक्ष्मण मदत करेल. आता परत जा आणि राज्य सांभाळ. माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी आहेत.”
भरतही आपला हेका सोडत नव्हता. राम अयोध्येस येईपर्यंत तो उपवास करणार असल्याचे त्याने सांगितले. वसिष्ठांनी त्यावर एक प्रस्ताव सुचवला. ‘राम परत येईपर्यंत भरताने रामाचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार करावा.’ हा प्रस्ताव सर्वांना मान्य झाला. तथापि भरत म्हणाला, “रामा, मला तुझ्या पादुका दे. मी त्या सिंहासनावर विराजित करेन आणि तू परत येईपर्यंत मी अत्यंत विश्वासूपणे सर्व शाही आदेशांचे पालन करेन. अयोध्येच्या जवळ असणाऱ्या एका गावात, एका छोट्या झोपडीत मी संन्यस्त जीवन व्यतीत करेन आणि तू आलास की तुझ्याबरोबर अयोध्येमध्ये प्रवेश करेन. जर तू १४ वर्षे संपल्यानंतर आला नाहीस तर मी माझे जीवन अग्निस अर्पण करेन.”
प्रश्न
- भरताने सम्राटपद स्वीकारण्यास नकार का दिला?
- अयोध्येस परतणे रामास का मान्य नव्हते?
- वसिष्ठांनी त्या समस्येचे सर्वांना समाधानकारक निराकरण कसे केले?