भरत आजोळाहुन परतला
राम वनवासाला निघाल्यावर दशरथाचे हृदय विदीर्ण झाले. तो बिछान्याला खिळला होता आणि राम, सीता आणि लक्ष्मणाच्या नावाने आक्रोश करत होता. त्याची बिकट अवस्था झाली होती आणि एका रात्री, ओठांवर रामाचे नाम असताना तो मृत्यू पावला. रामनाम जे गंगेच्या जलासारखे शुद्ध आणि पवित्र होते.
समस्त प्रजाजन शोकसागरात बुडून गेले. रामाच्या वनवासाबरोबर, त्यांच्या प्रिय राजाच्या मृत्यूने सर्व प्रजाजनांवर दु:खाचे सावट पसरले. कुलगुरू वसिष्ठांनी शांत राहण्याचा उपदेश केला आणि ताबडतोब भरत आणि शत्रुघ्नला त्यांच्या आजोळाहून परत येण्यास संदेश पाठवला.
ते त्वरित परत आले. भरताला नगरामध्ये सर्वत्र नेहमीपेक्षा वेगळी स्थिती आढळली. कोणीही त्यांच्याशी संभाषण केले नाही. तो थेट त्याच्या आईच्या महालामध्ये गेला. कैकयीने स्वागतासाठी भव्य तयारी केली होती. भरताचा पहिला प्रश्न होता, “पिताश्री कोठे आहेत? माझे नेहमी प्रेमाने स्वागत करणारे पिताश्री कोठे आहेत? राम आणि लक्ष्मण कोठे आहेत? ते मला कोठे दिसत का नाहीत”? कैकयीने प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले आणि युवराजास सर्व स्पष्ट करू सांगण्यासाठी मंथरेला बोलवले.
मंथरा अत्यंत उत्साहाने पुढे आली व भरताला म्हणाली, “प्रिय बाळा! आम्ही हे सर्व तुझ्यासाठी योजले आहे. आता मार्ग मोकळा झाला आहे. आता लगेच तुझा अयोध्येचा राजा म्हणून अभिषेक होईल. परमेश्वर महान आहे. आपल्या योजना यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्या आहेत. आता राज्याभिषेकासाठी सज्ज राहा. दुर्दैवाने तुझ्या पित्याचा अचानक मृत्यू झाला.”
भरताला ह्याचा काही उलगडा झाला नाही. परंतु पित्याच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्याला धक्का बसला. तो आक्रोश करत म्हणाला, “पिताश्री आजारी असताना मला अगोदर का बोलावले नाही? मला एक गोष्ट समजत नाही की माझा थोरला बंधू राजमुकुट धारण करण्यास पूर्णतः पात्र असताना माझा राज्याभिषेक का केला जात आहे? हे ऐकून मला वेड लागण्याची पाळी आली आहे. माते मला लवकरात लवकर सगळं सांग.”
कैकयीने प्रेमाने तिचा हात भरताच्या खांद्यावर ठेवला आणि सुहास्य वदनाने तिने त्याला भरताच्या हितासाठी मंथरेने कशी योजना आखली आणि पिताश्रींना कसे पेचात टाकले की आपल्या शब्दाचा मान राखण्यासाठी, ते त्यातून बाहेर येऊ शकले नाहीत हे सांगितले.
हळूहळू भरताला परिस्थितीची कल्पना आली. तो अत्यंत क्रोधित झाला. त्याने आपल्या मातेला जोराने ढकलले व तिच्या अंगावर मोठ्याने ओरडला, “तू कशी स्त्री आहेस! तुझ हृदय पाषाणाचे आहे का? तुझ्या कृतींनी पिताश्रींना मारले हे तुझ्या लक्षात आले नाही का? रामाला दुःख देण्याचा विचार तरी तुझ्या मनात कसा आला? तो तुला स्वतःच्या मातेप्रमाणे मानत नाही का? सीतेसारख्या धर्मपरायण स्त्रीला तू किती दुःख दिलेस ह्याची तुला कल्पना आहे का? राम आणि सीतेच्या अनुपस्थितीने कवडीमोल झालेल्या या राज्याचे अधिपत्य करण्याची मला महत्त्वाकांक्षा असेल असे तुला वाटले का?
तू खरच अशी कल्पना केलीस का की तुझा पुत्र क्षणभरासाठी रामापासून वेगळे राहण्याचा विचार करेल? जर तू खरंच असा विचार केला असशील तर तू माझी माता नाहीस. मला तुझं तोंडही दाखवू नकोस. तू इक्ष्वाकू वंशाला कलंक लावला आहेस. माझ्यासाठी रामाच्या चरणांखेरीज कोणतेही स्थान नाही. आता त्वरित जंगलात जाऊन मी रामाला घेऊन येतो.”
असे म्हणून तो तेथून निघाला. भरत क्रोधाने धुमसत असताना, शत्रुघ्नाने मंथरेचा ताबा घेतला. तिचे केस ओढून तो तिला मारू लागला. तोपर्यंत भरताचा राग शांत झाल्याने त्याने शत्रुघ्नला, त्या कुबड असलेल्या स्त्रीस अधिक इजा पोचवण्यापासून थांबवले.
त्यानंतर ते दोघे बंधू, पूर्णतः ढासळून पडलेल्या कौसल्येकडे गेले. त्यांनी तिच्या पायावर लोळण घेतली. भरताने तिला त्यांच्याविषयी गैरसमज करून घेऊ नये अशी विनवणी केली. त्यांना त्या योजनेविषयी काहीही माहित नसल्याचे त्यांनी तिला सांगितले. त्यावर कौसल्येने अत्यंत प्रेमाने तिला भरताचा प्रेमळ स्वभाव माहित असल्याचे सांगितले. ती म्हणाली, “ह्यासाठी कोणालाही दोष देऊ नये. तुमच्यासाठी माझे प्रेम सदैव आहे.”
वशिष्ठानी भरतास संदेश पाठवून एका सभेस उपस्थित राहण्यास सांगितले व सर्व पूर्ववत चालू करण्याची कशी आवश्यकता आहे त्याविषयी ते त्याच्याशी बोलले. त्यासाठी ते म्हणाले की, “भरताने राज्यकारभार करावा आणि राम परतल्यावर राज्य रामाच्या स्वाधीन करावे.”
भरताने त्यांचा सल्ला ऐकला व तो निर्धाराने त्यांच्याशी बोलला, “मी तुमचा आदर करतो. मी तुमच्या मैत्रीपूर्ण शब्दाबद्दल कृतज्ञ आहे. परंतु मला क्षमा करा. राम वनवासामध्ये संन्याशासारखा भ्रमण करत असताना, मी राजा म्हणून येथे राहू शकत नाही. माझी केवळ एकच इच्छा आहे. मी वनात जाऊन त्याच्या पायावर लोळण घेईन आणि त्याने परत येऊन राज्य संभाळावे अशी याचना करेन. रामाला वनातून परत आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो.”
भरताची भक्ती, प्रामाणिक भावना व त्यागवृत्ती पाहून सर्वजण भारावून गेले. राम आयोध्येस परत येण्याच्या संभावनेने त्यांची मने उल्हासित झाली. रामाला वनात भेटायला जाण्यासाठी आणि गरज पडल्यास वनामध्येच राज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यासाठी, भरताने मंत्र्यांना सर्व तयारी करण्यास सांगितले.
प्रश्न:
- अयोध्येस परतल्यानंतर भरताची प्रतिक्रिया काय होती?
- सर्वांनी भरतास राज्यकारभार चालवण्याची विनंती केली तेव्हा भरताने काय केले?