युतीची स्थापना
राम आणि लक्ष्मणानी सीतेच्या शोधार्थ दक्षिण दिशेकडे प्रयाण केले. जंगलात एका ठिकाणी जटायू नावाचा एक गरुड पक्षी जीवन-मरणाच्या सीमेवर संघर्ष करताना आढळला. दोघा बंधूंनी त्याच्या जखमा धुतल्या व त्याची अशी व्यवस्था कशामुळे झाली ते विचारले. जटायूने सांगितले, “रामा, मी रावणाला, हवाई रथातून सीतेला घेऊन जाताना पाहिले. मी त्याला अडवले आणि माझ्या कमाल शक्तीनुसार मी त्याच्याशी युद्ध केले. परंतु ह्या भयंकर लढ्याचा सामना करण्यास वृद्धत्वामुळे मी असमर्थ ठरलो.
अखेरीस त्याने माझे पंख छाटले. व ही बातमी तुम्हाला देण्यासाठी आतुरतेने तुमची प्रतीक्षा करत येथे पडून राहिलो. तुमची थोडीफार सेवा करण्याची संधी मिळाल्यानंतर आता मला शांतपणे मरण येईल.”
राम लक्ष्मणानी त्याच्या देहावर अग्नीसंस्कार केले व ते मार्गस्थ झाले. काही दिवसांनी ते पंपा नदिच्या तीरावर पोहोचले. किष्किंधा नगरीचा वानरांचा राजा वाली ह्याचा धाकटा बंधू सुग्रीव ह्याची तेथे भेट झाली. वाली व सुग्रीव ह्यांच्यामध्ये झालेल्या लढ्यात वालीने त्याला निर्वासित केले. सुग्रीवाने ऋषमुख पर्वतावर तात्पुरते निवास स्थान बनवले व तो त्याच्या काही विश्वासू अनुयायांबरोबर तेथे राहत होता. त्यांच्यापैकी हनुमान हा सर्वात महत्त्वाचा अनुयायी होता.
सुग्रीव आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्वांनी राम-लक्ष्मणास पंपा नदीच्या तीरावर भ्रमंती करताना पाहिले. वालीने ह्या दोघांना येथे पाठवले असावे असे वाटून सुग्रीव भयभीत झाला. परंतु त्याचा बुद्धिमान मंत्री हनुमानाने त्याचे भय दूर केले. हनुमान टेकडीवरून खाली उतरला आणि त्या दोघा राजकुमारांना भेटला व त्यांची चौकशी केली.
हनुमानाची विनयशीलता, सरलता आणि बुद्धिमत्ता ह्याने राम तत्क्षणी आकर्षित झाला आणि त्याने त्याची कथा सांगितली.
राम हनुमानाला म्हणाला, “वास्तविक आम्ही सुग्रीवाच्या शोधातच आहोत. आम्हाला त्याच्याशी मैत्री करायची आहे.”
ते ऐकून हनुमान अत्यंत आनंदीत झाला. तो त्यांना सुग्रीवाची भेट घेण्यासाठी टेकडीवर घेऊन गेला. सुग्रीवाने त्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यांचे आदरातिथ्य केले. सुग्रीवाने त्यांचा बंधू वाली बरोबर झालेल्या लढ्याची हकीकत कथन केली. तो म्हणाला, “रामा, आपल्या दोघांची दुर्दशा एकच आहे. आपण दोघांनी एकमेकांना मदत करण्याची अत्यंत गरज आहे.”
हनुमानाने त्यांच्या संवादात हस्तक्षेप करून, राम आणि सुग्रीवानी युती करावी असे सुचवले. रामाने सुग्रीवाचे राज्य परत मिळवण्यासाठी आणि सुग्रीवाने रामाची पत्नी परत मिळवण्यासाठी, दोघांनी एकमेकांना मदत करावी. सगळ्यांनाच हा प्रस्ताव मान्य झाला. त्यानंतर सुग्रीवाने, आकाशातून त्यांच्या भागात पडलेली काही आभूषणे वानरांना घेऊन येण्याची आज्ञा केली. जेव्हा त्यांनी माना वर करून आकाशात पाहिले होते तेव्हा एक राक्षस एका स्त्रीला जबरदस्तीने दक्षिणेकडे घेऊन जात असल्याचे त्यानी पाहिले होते. ती आभूषणे पाहून रामाची शुद्ध हरपली. सुग्रीवाने लक्ष्मणास आभूषणांची ओळख पटते का ते पाहण्यास सांगितले. लक्ष्मणाने बारकाईने त्यांचे निरीक्षण करून पायातील पैंजण ओळखले. ते नि:संशयपणे सीतेचे पैंजण असल्याचे त्याने सांगितले. तो दररोज तिच्या चरणांचे पूजन करत असल्यामुळे केवळ तेच तो ओळखू शकला. परंतु देहावर धारण केलेले बाकीचे दागिने तो ओळखू शकला नाही. त्याच्या भक्तीने व सदाचरणाने वानरे हेलावून गेली.
राम शुद्धीवर आल्यानंतर त्याने सीतेची अन्य आभूषणे ओळखली. सुग्रीवाने वालीच्या शक्तीसामर्थ्याचे वर्णन केले. त्याला स्वतःसाठी रामाचे शक्तीसामर्थ्य ही पाहायचे होते. रामाने त्याचे शक्तीसामर्थ्य दर्शविण्यासाठी एक बाण सोडला जो ओळीनी सात ताल वृक्षांना छेदून त्याच्याकडे परत आला. रामाचे सामर्थ्य पाहून सुग्रीव थक्क झाला.
सुग्रीवाने वालीला युद्धासाठी आवाहन द्यावे आणि त्यांचे युद्ध चालू असताना रामाने वालीचा वध करावा असे त्यांनी ठरवले. सुग्रीव किष्किंधा नगरीस गेला आणि त्याने वालीच्या महालापुढे मोठ्याने गर्जना केली. वाली बाहेर आला आणि घनघोर युद्ध सुरू झाले. सुग्रीव आणि वाली दोघांचे स्वरूप, पेहराव आणि ते वापरत असलेली शस्त्रे अशा प्रत्येक बाबतीत त्या दोघांमध्ये एवढे साधर्म्य होते की त्यांच्यामधील वालीला आणि सुग्रीवाला ओळखणे रामाला शक्य होत नव्हते. राम संभ्रमात पडल्याने शांत राहिला.
सुग्रीव वालीकडून पराभूत होऊन ऋष्यमुख पर्वतावर परतला. रामाने त्याचा शब्द पाळला नाही असा सुग्रीवाने आरोप केला. रामाने कृती का केली नाही याचे कारण विशद करून सांगितले. तो म्हणाला, “प्रिय मित्रा, जा आणि पुन्हा एकदा वालीस युद्धाचे आव्हान दे. परंतु ह्या वेळेस तू गळ्यामध्ये फुलांचा हार घाल म्हणजे मी तुला ओळखू शकेल.” सुग्रीवाने ते मान्य केले. पर्वतावरून खाली येऊन त्याने वालीला युद्धाचे आव्हान दिले.
वाली त्याच्या राण्यांबरोबर बसला होता. तो जाण्यासाठी उठला. परंतु त्याच्या तारा राणीने त्यांने जाऊ नये ह्यासाठी आर्जव केली. ती म्हणाली, “मला धोक्याची जाणीव होतेय. काल तर तुमचा बंधू तुमच्याकडून पराभूत झाला. तो तुम्हाला एवढ्या लवकर लगेचच युद्धासाठी आवाहन देतोय हे तुम्हाला विचित्र वाटत नाही का? त्याच्या पाठीशी कोणीतरी शक्तीशाली सहयोगी असावेत अशी मला भीती वाटते.”
वालीने तिच्या विरोधास न जुमानता तो सुग्रीवाला समोरा गेला. यावेळी भयंकर युद्ध झाले. वृक्षाच्या मागे लपलेल्या रामाने एका तेजस्वी बाणाने अचूक नेम धरून वालीचा वध केला. गंभीर जखमी होऊन वाली खाली कोसळला. राम-लक्ष्मण त्याच्याजवळ गेले. वालीने रामावर, त्याला मारण्यासाठी कपटनीतीचा वापर केल्याचा आरोप केला. रामाने असे का केले त्याचे कारण त्याला स्पष्ट करून सांगितले. तो म्हणाला, “तू तुझ्या भावाचे राज्य हडप केलेस. तू तो अधर्म केलास. राजपुत्र म्हणून धर्माची संस्थापना करणे माझे कर्तव्य आहे. शिकारी झाडामागे लपून जंगली श्वापदांची शिकार करत नाही का?”
वालीने त्याच्या विधिलिखिता पुढे मान तुकवून शांतपणे मृत्यूला आलिंगन दिले. राम आणि सुग्रीवाच्या युतीमधून बंधूप्रेमाचे काही चांगले तुलनात्मक विचार पुढे येतात. एका बाजुला राम आणि भरत आणि दुसऱ्या बाजूला वाली आणि सुग्रीव दोन्ही बाबतीत भावाभावांमध्ये एकमेकांविषयी अत्यंत प्रेम होते. परंतु प्राप्त परिस्थिती आणि दुःख ह्यामधुन राम आणि भारताचे उच्च कोटीचे गुण बाहेर आले. जेव्हा वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मतभेद उभे राहिले, तेव्हा वालीने सुग्रीवास दंड दिला. दोघे भाऊ एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. याउलट राम आणि भरत दोघांनीही त्यांना देऊ केलेले राज्यपद अव्हेरले.
प्रश्न:
- राम आणि सुग्रीव ह्यांच्या अवस्थेमध्ये काय समानता होती?
- राम आणि भरत तसेच वाली आणि सुग्रीव यांनी प्रदर्शित केलेल्या गुणांची तुलना करा.