रावणाचा संहार
राक्षस आणि वानरांमध्ये धमासान युद्ध सुरु झाले. सुग्रीव, हनुमान, अंगद, जांबवान आणि वानरांच्या सेनापतींनी, एकएक करून रावणाच्या शक्तिशाली सेनापतींचा पाडाव केला. युद्धाचा कल राक्षसांना अनुकूल नसल्याचे रावणाच्या लक्षात आले.
रावणाचा अत्यंत बलशाली सरसेनापती प्रहस्त मृत्युमुखी पडल्यावर, रावण स्वतःच युद्धभूमीवर उतरला. रामाने प्रथमच रावणाला पाहिले. त्याच्या मनात प्रशंसा व आदरभाव उमटला. “परंतु त्याच्या दुष्कृत्यांसाठी तो किती शक्तिशाली व्यक्ती आहे.” रामाच्या मनात आले. राम आणि रावण एकमेकांसमोर उभे ठाकले. रामाने रावणाच्या मुकुटास तडाखा देऊन तो खाली पडला. त्याच्या रथाची मोडतोड केली व त्याची सर्व शस्त्रे नष्ट केली. रामापुढे रावणाची मती कुंठीत झाली व तो निष्प्रभ झाला, असहाय्य झाला.
परंतु राम दयाळूपणे त्याला म्हणाला, “रावणा, मी नि:शस्त्र योध्यावर वार करत नाही. जा आणि उद्या नवीन शस्त्र घेऊन परत ये.” रावण उद्विग्न होऊन त्याच्या महालात परतला. रावणाच्या मनात क्रोधाचे वादळ उठले होते. आजपर्यंत कोणीही त्याला युद्धात पराभूत केले नव्हते. प्रथमच त्याला अपराधी वाटू लागले. परंतु त्याचा अहंकार आणि दुराभिमानाने त्यावर मात केली आणि त्याने त्याचा भाऊ कुंभकर्ण ह्यास जागे करून युद्धावर पाठवण्याची आज्ञा केली.
कुंभकर्ण जागा झाला व रावणाच्या दरबारात आला. रावणाने त्याची दैन्यावस्था जेव्हा कुंभकर्णाला सांगितली तेव्हा कुंभकर्णाने रावणाला फटकारले. “तू दुसऱ्याची पत्नी पळवून आणण्याचे अत्यंत लज्जास्पद कृत्य केले आहेस. तू अगोदर त्याला युद्धात पराभूत करून त्यानंतर त्याच्या पत्नीस आणायला हवे होते. तू केवळ तुझी स्तुतिसुमने स्वीकारून तुझ्या हिताचा सल्ला नाकारलास. तथापि घोर संकटात सापडलेल्या भावाच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.”
असे म्हणून कुंभकर्ण युद्धभूमीवर गेला आणि त्याने राम आणि त्याच्या सैन्यावर जोरदार हल्ला केला व तेथे उत्पात माजवला. रामाला ते सहन करणे शक्य नव्हते. त्याने कुंभकर्णाशी घनघोर युद्ध करून त्याला ठार मारले.
लक्ष्मणाच्या हातून इंद्रजित मारला गेला. रावण अत्यंत क्षुब्द झाला. तो त्याचे दोष पाहून लागला. तो हताश झाला होता. तथापि तो एक शूरवीर योद्धा असल्यामुळे, त्याने अखेरपर्यंत लढायचे ठरवले.
रावणाचा स्वर्गीय रथ सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होता. तो युद्धभूमीवर उतरला. समस्त वानरसेनेचा प्रतिकार करून त्याने रामावर हल्ला चढवला. रावणाशी युद्ध करताना रामाने त्याचे धनुर्विद्येतील सर्व कौशल्य दर्शवले. देवांचा राजा इंद्राने, रामाला सहाय्य करण्यासाठी त्याचा दिव्य रथ आणि सारथी मातलीस रामाकडे पाठवले.
रामाने त्या दिव्य रथास नमन करून तो त्यामध्ये विराजमान झाला. त्याने एका मागोमाग एक रावणाच्या शीरांचा छेद केला. परंतु आश्चर्य म्हणजे कापलेली शीरे पुन्हा तेथे अंकुरित होत होती. त्यानंतर, अगस्त्य ऋषिंनी दिलेल्या दिव्य अस्त्राची, मातलीने रामाला आठवण करून दिली. रामाने कृतज्ञतेने त्याचा सल्ला मानून दिव्यास्त्रांचा वापर केला. त्या शक्तिशाली दिव्यास्त्राने अत्यंत वेगाने हवेला कापत जाऊन, रावणाची छाती फाडली. जेथे रावणाच्या सर्व शक्ती केंद्रित होत्या. रावणाचा विनाश झालेला पाहून वानरांनी आणि आकाशातून युद्धाचे अवलोकन करत असलेल्या स्वर्गीय देवदेवतांनी महाआनंद व्यक्त केला. बिभीषण त्याचा शोक आवरु शकला नाही. रामाने त्याचे सांत्वन केले, “बिभिषणा, काही झाले तरी तो तुझा भाऊ होता. त्याला वीरमरण आले. आदराने त्याच्यावर अंत्यसंस्कार कर.”
रामाने लक्ष्मणास सांगितले, “रावणाचे किती महान व्यक्तिमत्त्व होते हे तू पाहिलेस परंतु लालसा आणि अहंकार ह्या बाबतीत त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही.”
प्रश्न:
- कोणत्या गोष्टीमुळे, रावणाला युद्धाच्या परिणामाविषयी विचार करणे भाग पडले?
- कुंभकर्णाला युद्धावर जाण्यास सांगितल्यावर त्याची प्रतिक्रिया काय होती?
- रामाचे रावणाविषयी काय मत होते?