चमकदार सुवर्णाचा मोह
राम, सीता आणि लक्ष्मण त्यांच्या पर्णकुटीमध्ये आनंदाने जीवन व्यतीत करत होते. नुकतीच वसंतऋतूची सुरुवात झाली होती. वृक्षांच्या फांद्याना कोवळे कोंब फुटले होते. निसर्ग सौंदर्याची उधळण करत होता.
एका सकाळी, सीता फुले वेचण्यासाठी वृक्षवेलींमध्ये फिरत होती. अचानक वृक्षामधून येणारे सोनेरी किरण तिच्या दृष्टीस पडले. सीतेला सुवर्णाची काया व त्यावर रुपेरी ठिपके असलेले एक हरीण दृष्टीस पडले. त्याचे डोळे रत्नांसारखे चमकत होते. त्याचे रूप पाहून ती थक्क झाली. तिचे मन आनंदाने भरून गेले. तिने रामाला हाक मारली. “हे प्रियतम, इकडे या आणि ते कांचनमृग पाहा. अयोध्येस परत जाताना, ही आयोध्येच्या लोकांसाठी अमूल्य भेट ठरेल! तुम्ही माझ्यासाठी हे कांचनमृग पकडून आपल्या पर्णकुटीत आणणार नाही का?”
जवळपास असलेल्या लक्ष्मणाने, तिचे बोलणे ऐकले. त्यावर सखोल विचार करून तो म्हणाला, “बंधो मला हे खरं हरिण आहे असं वाटत नाही. आपण शूर्पणखेचा अवमान केल्यापासून राक्षस काहीना काही षड्यंत्र रचत आहेत. हा त्याचाच एक भाग असावा. सावध राहा आणि त्याला एकटे सोडून दे.”
एकीकडे सीतेची आर्जवे आणि दुसरीकडे लक्ष्मणाचा धोक्याचा इशारा अशा दुविधेमध्ये राम सापडला होता. थोड्या वेळाने तो लक्ष्मणाला म्हणाला, “कदाचित तू म्हणतोयस ते बरोबर असेल तरीही त्याचा पाठलाग करण्यात मला काही गैर वाटत नाही. जर ते राक्षसांचे षड्यंत्र आहे असे उघड झाले तर मी तात्काळ त्याचा वध करून त्याला इकडे घेऊन येईल. आपण त्याची कातडी काढून तिचे स्मृतिचिन्ह म्हणून जतन करु.
त्यानंतर धनुष्यबाण घेऊन राम जंगलात जाण्यास निघाला. जाण्यापूर्वी, त्याने लक्ष्मणाला सीतेचे रक्षण करण्यास सांगितले व कोणत्याही परिस्थितीत त्याने तिला एकटे सोडू नये असेही बजावले.
लक्ष्मण सीतेच्या रक्षणार्थ पहारा देत होता व राम हरिणाच्या मागे गेला. सीता रामाच्या हालचाली टीपत होती. हरिण वेगाने धावत होते आणि राम त्याचा पाठलाग करत होता. राम त्या हरणाला पकडणार, तेवढ्यात त्याने चपळाईने उडी मारून त्याला चकवा दिला. आणि पुन्हा पुन्हा चकवा देत ते कांचनमृग रामाला पर्णकुटीपासून खुप दूर जंगलात घेऊन गेले.
आता राम अधिक सहनशीलता बाळगू शकत नव्हता. त्याने त्याला मारण्याचे ठरवून त्याच्याकडे एक बाण सोडला. त्या बाणाने हरणाच्या शरीराचा वेध घेतला. अरेरे! त्या हरणाचे मारिच राक्षसामध्ये रूपांतर झाले. मृत्युपूर्वी, तो रामाच्या आवाजात मोठ्याने ओरडला, “धाव लक्ष्मणा धाव.” रामाला ते दृश्य पाहून आश्चर्य वाटले. सीतेने तो विलाप ऐकला व तो रामाचा आवाज आहे. असा गैरसमज करून ती लक्ष्मणाला म्हणाली, “तू ऐकले नाहीस का? तुझा बंधू संकटात आहे. त्वरित त्याच्याकडे जा.”
हे अन्य काही नसून राक्षसांचे षड्यंत्र असल्याचे लक्ष्मणाने ओळखले होत. त्यावर विचलित न होता त्याने सीतेला म्हटले, “माते, हे राक्षस रामाला कधीही इजा पोहचवू शकत नाहीत. तो अजिंक्य आहे. मी तुला एकटीला सोडू शकत नाही. सीतेचा संयम ढळला व ती प्रतिवाद करत म्हणाली, “लक्ष्मणा, आता तू तुझे खरे रंग दाखवत आहेस. माझ्या पतीचा वध झाल्यावर मला प्राप्त करून घेण्याच्या या संधीची तू प्रतीक्षा करत होतास. रामाशिवाय अन्य कोणताही मनुष्य सीतेला स्पर्श करू शकणार नाही. जर तू तात्काळ इथून गेला नाहीस तर मी चिता निर्माण करून त्यामध्ये स्वतःला समर्पित करेल.
तिचे अत्यंत वेदनादायी बोल ऐकून लक्ष्मणाने जंगलात जाण्याचे ठरवले. तथापि जाण्याअगोदर त्याने सीतेला, कोणत्याही कारणास्तव पर्णकुटीच्या दरवाजाबाहेर येऊ नये अशी विनंती केली. तेथे राक्षसांचा संचार असल्यामुळे तिला काळजी घेण्यास सांगितली. सीता एकटी होती. अचानक तिने एका भिक्षुला पर्णकुटीकडे येताना पाहिले. तो राक्षसाचा राजा रावण होता. तिच्या सौंदर्याने प्रभावित होऊन तो तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या नजरेने सीता अस्वस्थ झाली व आतील दालनात जाऊ लागली. अचानक रावणाने तिचा हात पकडून तिला ओढत बाहेर आणले. त्याच्यापासून सुटकेसाठी संघर्ष करणाऱ्या सीतेला, त्याने जवळच उभ्या असलेल्या दिव्य रथात बसवले आणि दक्षिणेकडे प्रस्थान केले.
सीता मोठ्याने आक्रोश करून जंगलवासीयांना तिच्या मदतीसाठी आर्ततेने आवाहन करत होती.
गरुडांचा राजा जटायूने सीतेचा आक्रोश ऐकला. तो वृक्षांच्या शेंड्यावर विश्राम करत होता. शक्तिशाली पंखांच्या साह्याने त्याने वेगाने आकाशात भरारी घेतली व रावणाला अडवले.
प्रथम त्याने सीतेला कोणतीही इजा न पोचवता सोडून देण्याचे रावणाला आवाहन केले. राम हा पृथ्वीतलावरील सर्वात शक्तिशाली मानव आहे आणि तो नक्कीच त्याचा वध करेल, असेही सांगितले. परंतु, रावणाने त्याकडे दुर्लक्ष केले. जटायूने त्याच्या सर्व शक्तिनिशी रावणावर हल्ला केला. त्याच्या रथाची मोडतोड केली व त्याच्या शरीरावर अनेक वेदनादायी जखमा केल्या. परंतु, रावणाच्या शक्तीपुढे त्याची शक्ती क्षीण ठरली व लवकरच तो थकला रावणाने चपळाईने जटायूचे पंख छाटले. जटायू असहाय्यपणे खाली पडला आणि रावणाचा लंकेकडे प्रवास सुरू झाला.
प्रश्न:
- सीतेला त्या कांचनमृगाची भुरळ कशी पडली?
- त्या हरणाविषयी लक्ष्मणाचे मत काय होते?
- सीतेने रामाला कसे गमावले?