विनाशक मार्ग
लंकेचा अधिपती रावण ह्याने त्याच्या अतुलनीय पद्धतीने दरबार भरवला होता. त्याने इंद्रासहित सर्व देवादिकांना पराभूत केले होते. आणि अष्टदिक्पाल त्याच्या महालात पहारेकरी म्हणून काम करीत होते.
अकंपन नावाच्या राक्षसाने तेथे प्रवेश केला. तो भीतीने थरथर कापत होता. त्याने रावणाला अभिवादन केले. रावणाने गर्जना करत त्याला विचारले, “तू भयभीत का झाला आहेस? ये आणि तुला जे काही सांगायचे आहे ते सांग.” कापऱ्या आवाजात त्याने सांगितले की राम नावाच्या राजपुत्राने दंडकारण्यात प्रवेश करून कसे शूर्पणखेचे नाक कापले आणि खरं, दूषण, त्रिशूल व तेथे असलेल्या समस्त असुरांचा वध केला”.
ते ऐकून रावण अत्यंत क्रोधित झाला. तो सिंहासनावरून उठला व त्याने घोषित केले, “मी त्या राम नावाच्या क्षुद्र जीवाचा त्वरित वध करेन.” अकंपनाने त्याला, ते तेवढे सोपे नसल्याचे सांगितले. “परंतु एक मार्ग आहे. रामाची पत्नी एवढी सुंदर आहे की मी तिचे वर्णनही करू शकत नाही. परंतु तुम्ही कसेही करून तिला मिळवण्याचा प्रयत्न करा. राम तिच्यासाठी मृत्यूसुद्धा पत्करेल.” रावण शांत झाला व त्याच्या सूचनेवर विचार करण्यास उद्युक्त झाला.
दुसऱ्या दिवशी रावण मारीचाच्या आश्रमात गेला. रावणाने त्याच्या योजनेचा आराखडा मारीचाला सांगितला व सीतेचे अपहरण करण्यासाठी मारीचाने त्याला मदत करावी अशी विनंती केली. मारीच अत्यंत बुद्धिमान होता. त्याने रावणाला रामाशी शत्रुत्व पत्करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, “स्वामी, रामाचा विचार करू नका. जर तुम्ही त्याच्याशी भांडण काढलेत तर तुमच्या वंशाचा अंत होईल. तुमच्या दुराभिमानास आणि अहंकारास, तुमच्या सुज्ञतेस झाकोळून टाकण्याची अनुमती देऊ नका. रामाचे सामर्थ्य मी जाणतो तो १६ वर्षांचा असताना त्यांनी माझ्या शरीरावर केलेल्या जखमांचे व्रण पहा. तुमची आणि तुमच्या वंशाची भरभराट होवो हीच माझी इच्छा आहे. असुर वंशाचा नाश करणाऱ्या योजनेत मी सहभागी होऊ शकत नाही.” रावणालाही त्याचे म्हणणे म्हणणे पटले व तो लंकेस परतला.
दुसऱ्या दिवशी त्याची बहीण शूर्पणखा त्याच्या महालात आली. तिचे नाक व कान कापले होते. राम आणि लक्ष्मण नावाच्या दोन मानवांनी तिचा कसा अवमान केला आणि ती तरुण स्त्री सीता, तिच्या विडंबनेवर हसली त्याचे वर्णन तिने केले.
तिने रडून आकांत केला. रावणाने तिचे सांत्वन करायचा प्रयत्न केला. “तुला पोहचलेल्या हानीची भरपाई करण्यासाठी मी काय करू शकतो?” ती म्हणाली, “त्या सीतेला अवमानित केल्याशिवाय मी झोपणार नाही वा अन्न घेणार नाही. तिचे सौंदर्य पाहून मी ठरवले की तुझ्या अंत:पुरामध्ये तिला स्थान मिळायला हवे. तिच्यासाठी तू पात्र व्यक्ती असशील. ती अत्यंत आकर्षक आहे.”
तिच्या शब्दांनी रावण अत्यंत मोहित झाला. त्याने त्याच्या बहिणीला ग्वाही दिली की तो लगेच सीतेचे अपहरण करण्यासाठी दंडकारण्याकडे प्रस्थान करेल व तिला लंकेला घेऊन येईल. “प्रिय शूर्पणखे, मी तुला आनंदी करेन आणि जर तसे नाही केले तर माझ्या नावलौकिकास मी पात्र नाही.” अशी त्याने घोषणा केली.
ह्या निर्धाराने, तो पुन्हा मारीचाकडे गेला. काहीतरी गोंधळ असल्याचे मारीचाने ओळखले. रावणाने योजना उलगडून सांगितली. मारीचाने कांचनमृगाचे रूप धारण करून रामाला त्याच्या पर्णकुटीपासून दूर न्यावे. रामाला दूर जंगलात घेऊन गेल्यानंतर मारीचाने रामाच्या आवाजात मोठ्याने लक्ष्मणाला बोलावून त्यालाही त्या कुटीपासून दूर घेऊन जावे. अशा रीतीने सीता तेथे एकटीच असेल आणि तेव्हा रावण तिचे अपहरण करेल.
ते ऐकून मारीच स्तब्ध झाला, हात जोडून तो रावणाला म्हणाला, “स्वामी, कृपा करून राम आणि सीतेला इजा पोचवण्याची कल्पना सोडून द्या. मला खात्री आहे की राम तुम्हाला सोडणार नाही. तुमचा आणि समस्त राक्षस कुलाचा नाश होईल. तुम्ही राक्षस कुळाला नाव आणि गौरव प्राप्त करून दिला आहे. तुम्ही स्वतःहाच तो उद्ध्वस्त का करताय?”
ह्यावेळी रावण मनाचा निर्धार करूनच तेथे आला होता. तो माघार घेणार नव्हता. ह्याशिवाय सीतेविषयी त्याच्या मनात लालसा निर्माण झाली होती. सद्बुद्धी क्षीण झाली होती. मारीचाकडे वळून तो म्हणाला, “मी येथे तुझ्याकडून सल्ला घेण्यासाठी आलो नाही. मी राजा म्हणून तुला आदेश देतोय.” मारीचाकडे पर्याय उरला नाही. रावणाने विनाशाचा मार्ग निवडल्याचे तो जाणत होता. त्यापासून रावणाला दूर करण्यासाठी त्याने कसोशीने प्रयत्न केले, परंतु व्यर्थ! जर त्याने अवज्ञा केली तर रावण त्याचा वध करेल. त्याऐवजी त्याने विचार केला, “मला माझ्या स्वामींच्या आज्ञेचे पालन करून दिव्य रामाच्या हातून मृत्यू येऊ दे.”
रावण आणि मारीच, त्यांची कपटी योजना कार्यान्वित करण्यासाठी दंडकारण्याकडे निघाले.
प्रश्न:
- रामाशी भांडण काढण्यासाठी रावणाला कोणत्या गोष्टीमुळे चिथावणी मिळाली?
- मारीचाने रावणाला कोणता सल्ला दिला?