बिभीषणाची रामाच्या चरणी शरणागती
रावणाने बिभीषणाचा सल्ला नाकारल्यानंतर, त्याने पुन्हा एकदा रावणाचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. बिभीषणाने सभागृहामध्ये रावणाच्या पाया पडून वारा कसा वाहतो आहे, त्याचा त्याने रोख लक्षात घ्यावा ह्यासाठी याचना केली. रावण खरोखर संतप्त झाला होता. त्याने बिभीषणाच्या छातीवर लाथ मारली व त्याने गद्दारी केल्याचा त्याच्यावर आरोप केला.
बिभीषणाला तो अवमान सहन झाला नाही म्हणून तो त्याच्या चार विश्वासू अनुयायांबरोबर सभागृहातून बाहेर पडला. रामाचे चरण हेच त्याच्यासाठी योग्य स्थान असल्याचे त्याने सुनिश्चित केले. त्या पाचही जणांनी समुद्रावरुन उड्डाण केले आणि वानर सेनेच्या दिशेने गेले.
वानर पहारेकऱ्यांना आकाशात पाच काळा आकृत्या दिसल्या आणि त्यांना मारण्यासाठी ते सज्ज झाले. बिभीषणाने मोठ्याने ओरडून सांगितले, “आम्ही तुमचे शत्रू नाही. आम्ही रामाच्या चरणी आश्रय घेण्यास आलो आहोत.”
ते खाली उतरले. त्यांना रामाकडे नेण्यात आले.
बिभीषणाने रामाच्या चरणी लोळण घेऊन, आश्रय देण्यासाठी प्रार्थना केली. ते पाहून सुग्रीवाने आवेशाने बिभीषणाला आश्रय देण्यास विरोध केला. तो म्हणाला, “ते रावणाचे गुप्तहेर आहेत. आपण त्यांना मारून टाकले पाहिजे.” राम शांत होता. त्याने लक्ष्मण, अंगद आणि हनुमानाचा सल्ला घेतला.
लक्ष्मणानेही विरोध दर्शवला. अंगदाने जेष्ठांवर निर्णय सोपवला. हनुमान म्हणाला, “स्वामी माझ्यापेक्षा तुम्हीच चांगले जाणता. परंतु तुम्हाला माझे मत हवे आहे तर बिभीषणाला आश्रय देऊ शकता असे मी सुचवतो. मी लंकेत असताना त्याच्या घरातून येणारे वेदमंत्रांचे स्वर मी ऐकले होते आणि तो त्यांची दैनंदिन पूजा अर्चा करताना आढळला. तो त्याच्या धार्मिक वृत्तीसाठी ओळखला जातो. रावणाच्या कुकर्मांचा तो नेहमीच निषेध करतो.”
सुग्रीव अजूनही त्यासाठी सहमत नव्हता. “हे प्रभू, जो त्याच्या भावाशी भांडतो, त्याच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवणार? समजा आपल्याशीही उद्या त्याने तसेच केले तर?” राम हसून म्हणाला, “तू तुझी स्वतःची कथा एवढ्या लवकर विसरलास? तुझ्या भावाशी भांडून तू माझ्याबरोबर आलास ना?” माझ्या प्रिय मित्रा, बिभिषणाकडे रावणाला सोडण्यासाठी कारण होते परंतु आपल्याला सोडण्यासाठी, त्याच्याकडे कारण नसेल. ह्याशिवाय, मी एक क्षत्रिय आहे. जो कोणी माझ्याकडे संरक्षण मागतो, त्याला संरक्षण देणे माझा धर्म आहे.”
त्यानंतर रामाने बिभिषणाला बोलावले. त्याला आलिंगन देऊन मित्रत्वाचे वचन दिले. त्याने वानरांना समुद्रजल आणण्यास सांगितले आणि अत्यंत साध्या पद्धतीने लंकेचा अधिपती म्हणून बिभीषणाचा राज्याभिषेक केला.
तरीही सुग्रीवाच्या मनात थोडा संशय होता. त्याने संकोच बाळगून रामाला विचारले, “प्रभू, जर खुद्द रावणाने तुमच्याकडे संरक्षण मागितले तर तुम्ही काय कराल?” राम म्हणाला, “मी निश्चितपणे त्याला संरक्षण देईन. मी माझे आयोध्येचे राज्यही त्याला देईन.”
रामाचे सदाचरण पाहून सर्वजण अचंबित झाले.
प्रश्न:
- बिभीषणाने रावणाच्या सभागृहाचा त्याग का केला?
- सुग्रीवाला कोणत्या शंका होत्या आणि रामाने त्याचे कसे निरसन केले?
- बिभीषणाला आश्रय देऊन रामाने कोणता महान गुण दर्शवला?