विश्वामित्रांची विनंती
राजा दशरथाच्या चार मुलांनी – राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चौघांनी मोठे होत असताना असामान्य लक्षणे प्रकट केली. रामाने कर्तव्य आणि सत्याबद्दलची अविचलित श्रद्धा दाखविली. लक्ष्मण अतिशय शिस्तप्रिय आणि भावनाविवश होता. भरत उदात्त आणि कर्तव्यदक्ष होता. शत्रुघ्न दयाळू आणि सौम्य होता. दशरथाने आपल्या चारही मुलांची त्यांना जे जे शिकणे आवश्यक होते ते ते शिकविण्याची उत्तम व्यवस्था केली. त्यामध्ये युद्धकला व धनुर्विद्येचाही समावेश होता. राजाला आपल्या मुलांचा अभिमान होता आणि त्याला आनंद वाटत होता. असेच दिवस जात असताना त्याला सांगितले गेले की विश्वमित्रमुनी राजदरबारात येऊ इच्छितात. दशरथ घाईने आपल्या सिंहासनावरून उठला आणि अत्यंत श्रद्धेने त्याने ऋषींचे स्वागत केले. त्याने त्यांच्या भेटीच्या उद्देश्याची विचारणा केली आणि ऋषींची कोणत्याही प्रकारची सेवा करण्याची तयारी दर्शविली, विश्वामित्रांनी आपली इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “सदाचरणाच्या सर्व कार्यांचे रक्षण करने है राजाचे कर्तव्य आहे. मी मोठ्या प्रमाणावर यज्ञ सुरु केला आहे, परंतु राक्षस त्याचा विध्वंस करीत आहेत. मी असे ठरविले की तुझा पुत्र राम या राक्षसांना शिक्षा देण्यास आणि यज्ञाचे रक्षण करण्यास योग्य आहे.”
या प्रसंगी दशरथ राजा स्तब्ध होता. त्याने सांगितले की या कामासाठी राम अतिशय लहान आहे. त्याने अयोध्येचे सर्व सैन्य विश्वामित्रांना देऊ केले. एवढेच नव्हे तर स्वतः त्या सैन्याचे नेतृत्व करण्याचे आणि राक्षसांबरोबर लढण्याचे मान्य केले. या गोष्टीचा विश्वामित्रांना राग आला. त्यांनी ताबडतोब आपले आसन सोडले आणि दशरथ आपला शब्द मोडत आहे म्हणून त्याचा उपहास केला.
अयोध्येच्या राजाच्या कुलगुरु वसिष्ठांना काही कटू घटनेचा अंदाज आला आणि त्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दशरथाला सांगितले “राजा, विश्वामित्र श्रेष्ठ साधु आहेत. त्यांना ज्ञान आहे की राम जरी मुलगा असला तरी राक्षसांना मारायला योग्य आहे आणि तो यज्ञाचे रक्षण करु शकेल. म्हणून कोणत्याही प्रकारे द्विधा न होता तू राम व लक्ष्मणाला या साधुंबरोबर पाठव. हा खरोखर तुझ्या मुलांना मोठा लाभ आहे.”
या उपदेशानंतर दशरथाने राम, लक्ष्मणाला पाठवायचे ठरवले आणि त्यांना ताबडतोब बोलावणे पाठविले. दोन्ही भाऊ दरबारात आले. रामाने आई, वडील, गुरु वसिष्ठ यांना वंदन केले आणि साधु विश्वामित्रांबद्दल आदर व्यक्त केला. दशरथाने मुलांना साधुबरोबर जाण्यास सांगितले आणि त्यांच्या आज्ञा पाळावयास सांगितले.
राजकुमारांचे पहिले साहस
विवामित्रांनी दोन्ही मुलांना घेतले आणि शरयू नदीच्या काठी एक रात्र ते राहिले. तेथे त्यांनी दोघांना थकवा व अशुभापासून रक्षण करण्याचे मंत्र दिले आणि शिवाय दिव्यास्त्रांचा प्रयोग कसा करायचा याचे ज्ञान दिले. तेथून ते पुढे गेले आणि त्यांनी गंगा नदी ओलांडली. ते दंडकारण्यात पोहोचले.
जंगलात त्यांना ताटका नावाची राक्षसी भेटली. तिच्यात अनेक हत्तीचे बळ आहे अशी तिची ख्याती होती. विश्वामित्रांनी रामाला ताबडतोब तिला मारण्यास सांगितले कारण ती ऋषी आणि यज्ञांना त्रास देणारी होती. तत्क्षणी रामाने विश्वामित्रांच्या आज्ञेचे पालन केले आणि धनुष्य बाण घेऊन ताटकेला मारले.
नंतर ते विश्वामित्रांच्या आश्रमात – सिद्धाश्रमात पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्रांनी अन्य पवित्र मुनींच्या मदतीने यज्ञ सुरु केला. यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांवर लक्ष ठेवण्यास राम-लक्ष्मणास सांगण्यात आले. सहाव्या दिवशी मारीच आणि सुबाहूच्या नेतृत्वाखाली राक्षसांच्या सैन्याने आकाश आच्छादून टाकले. हे दोघे दैत्यांचे नेते खाली प्रज्वलित केलेल्या पवित्र अग्नीच्या ज्वाळेत अपवित्र मांस आणि रक्त टाकण्यास सज्ज झाले. राम-लक्ष्मण यांनी सुबाहू व त्याच्या राक्षस सेनेचा संहार केला.
विश्वामित्रांनी यज्ञाची सफल सांगता केली व तरुण राजकुमारांना शुभाशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वामित्रांनी सांगितले की आपणाला आता मिथिलेला जायचे आहे. मिथिला जनकाची राजधानी होय. लक्ष्मण विरोध दर्शवीत म्हणाला की ते यज्ञाच्या संरक्षणासाठी आले होते आणि आता ते कार्य झाले आहे, तेव्हा आता अयोध्येला गेले पाहिजे. परंतु राम म्हणाले, “प्रिय बंधु, आपल्याला वडिलांनी या ऋषींच्या सूचनांचे पालन करावयास सांगितले आहे. तेव्हा त्यांच्या इच्छेप्रमाणे करणे हे आपले कर्तव्य आहे.”
अशाप्रकारे राम आणि लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र मिथिलेला जाण्यास निघाले.
प्रश्न:
- ऋषी विश्वामित्रांबरोबर राम आणि लक्ष्मणाला पाठवण्यास दशरथ कांकूं का करत होते?
- राजदरबारात आल्यावर रामाने प्रथम आईला, नंतर वडिलांना, गुरुंना व शेवटी येणाऱ्या ऋषिमुनींना वंदन का केले?