प्रेम हे सत्याचे प्रकटीकरण आहे. आत्मतत्त्व हे प्रेमाचे उत्पत्तिस्थान आहे. ते विशुद्ध, स्थिर, तेजस्वी, निर्गुण, निराकार, प्राचीन, शाश्वत, अमर आणि अमृतासारखे मधुर आहे. ही प्रेमाचे नऊ गुणविशेषणे आहेत. प्रेम कोणाचाही तिरस्कार करत नाही. सर्वांना एकत्र करते. एकात्म दर्शन प्रेम (प्रेम म्हणजे अद्वैताचा अनुभव)
जर विचार प्रेमाने ओथंबलेले असतील तर आपल्या हृदयात सत्य प्रकट होईल. जर आपल्या कृती प्रेमयुक्त असतील तर प्रत्येक कृतीतून सदाचरण दर्शवले जाईल. जर आपले भाव प्रेमामध्ये भिजलेले असतील तर आपण शांतीचा आनंद घेऊ शकू. आणि जर आपण सर्वव्यापक प्रकृतीमध्ये असलेले प्रेमतत्त्व अनुभवू शकलो, जाणून घेऊ शकलो तर अहिंसा तत्त्व आपल्याला वेढून टाकेल आणि आपल्या सर्व प्रयत्नांमध्ये त्याचे अस्तित्व असेल.
म्हणून प्रेम हा सर्व मूल्यांचा अंतर्प्रवाह आहे जो त्यांना दैवी गुण प्रदान करतो. परमेश्वराप्रती प्रेम म्हणजे भक्ती. ह्या विभागामध्ये, आता आपण “वैश्विक प्रेम ” या नावाची गोष्ट वाचू या . प्रेषित महंमदाच्या जीवनातील एक चित्तवेधक प्रसंग या मध्ये सांगितला आहे. जो महंमदाचा द्वेष करत असे त्याच्यावर महंमदाने प्रेमाचा वर्षाव केला याचे वर्णन या प्रसंगामध्ये केले आहे.