पत्रं पुष्पं – पुढील वाचन
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः
(अध्याय-९, श्लोक-२६)
जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ वा जल अर्पण करतो, त्या शुध्द अंतःकरणाने केलेल्या पान, फूल इत्यादींचा मी स्वीकार करतो.
परमेश्वराला प्रेमाने अर्पण केलेल्या छोट्याशा गोष्टीनेही परमेश्वर आनंदी होतो. तथापि अखिल विश्वाला अगणित भेटी बहाल करणाऱ्या परमेश्वरास आपण कोणती भेट अर्पण करू शकतो? फूलं, पानं, फळं वा जल जे आपण अर्पण करू ते सर्व तर त्याचीच निर्मिती आहे.
बाबा म्हणतात, “आपण आपल्या हातांनी परमेश्वरासाठी भेट न आणता हृदयातून भेट आणू या: आपल्या उदात्त विचारांची फुलं, निःस्वार्थ कर्माची फळं आणू या. इतरांच्या दुःखाने आपले अंतःकरण द्रवित होऊ दे आणि त्यातून आपल्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू आपण आपल्या प्रिय भगवंतास अर्पण करू.
तुम्ही त्याला किती गोड भात दिलात ह्याचा तो हीशेब ठेवत नाही परंतु तुम्ही किती गोड शब्द उच्चारलेत आणि तुमच्या विचारांमध्ये किती माधुर्य मिसळलेत हे तो पाहतो. बाजारामधून आणलेल्या अगरबत्तीचा सुगंध पसरवण्याचा प्रयत्न का करावा? तुमच्या भोवती, दिव्य विचारांच्या सुगंधाचा व सर्वांस भरभरून प्रेम देण्याच्या सुगंधाचा धूर भरून राहू दे.
एकदा संत एकनाथ व त्यांच्या सोबत्यांनी एक प्रतिज्ञा केली की वाराणसीहून एका पात्रामध्ये पवित्र गंगाजल भरुन घेऊन, भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या तीन सागरांचा जेथे संगम होतो, त्या रामेश्वर येथील शिवलिंगास त्या गंगाजलाने अभिषेक करू.
गंगाजल घेऊन शेकडो मैल अंतर ते पायी चालले. त्या तीर्थक्षेत्री ते पोहचत आले होते. एकनाथ देवस्थानाच्या अगदी जवळ आले असताना त्यांची नजर एका गाढवावर पडली. तहानेने व्याकुळ होऊन त्याचा जीव कासावीस झाला होता. ते धावतच त्याच्याजवळ गेले आणि कोणताही विचार न करता त्यांनी ते पवित्र गंगाजल त्याच्या तृषार्त मुखात ओतले. आपला जीव वाचवणाऱ्याकडे पाहताना त्या प्राण्याच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञ भाव दाटून आले.
एवढा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर, जेव्हा प्रतिज्ञेच्या परिपूर्तीची वेळ आली तेव्हा एकनाथांनी केलेले प्रतिज्ञेचे अपारंपरिक उल्लंघन पाहून त्यांच्या सोबत्यांना धक्काच बसला. ते अवाक झाले.
तथापि एकनाथ आनंदाने उद्गारले, “प्रयोजन लक्षात आले! शिवाने मागितले आणि घेतले. भगवान शिव आले आणि त्यांनी स्वीकार केला.” दुःखितांची केलेली कोणतीही सेवा परमेश्वराप्रत पोहोचते.