प्रस्तावना
‘रिलिजन‘ हा शब्द ‘Re-ligare’ या शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ – “सर्वांना एका मुळाशी , परमेश्वराशी बांधून ठेवणे.” जशी लहान मुलाची खेळून झाल्यावर सुरक्षा आणि रक्षणासाठी आईकडे परत जाण्याची इच्छा असते तशी मनुष्याचीही परमेश्वराचे सान्निध्य, त्याची दया, प्रेम आणि संरक्षण मिळावे अशी तीव्र इच्छा असते.
‘रिलिजन’ म्हणजे ईश्वराची दिव्य संरक्षक शक्ती व दिव्य वैश्विक नियम यांच्यावर श्रद्धा असणे व नैतिकतेच्या आधारावरील शिस्तबद्ध आचरण ठेवून चांगले वागणे, चांगले करणे व चांगले पाहणे. विश्वामध्ये ताळमेळ, सुसंवादित्व राखण्यासाठी धर्म आपल्याला सहाय्य करतो. सर्व धर्म हे मानव आणि त्याचा निर्माता ह्यांच्यामधील दुवा व पूल आहेत. सर्व धर्म आपापल्या पद्धतीने परमेश्वराचे वर्णन करण्याचा प्रयत्न करतात परंतु परमेश्वर प्राप्ती हेच सर्व धर्मांचे ध्येय आहे.
सर्व धर्म ऐक्यता
प्रादेशिक भाषांमध्ये धर्माला ‘मत’ हा शब्द वापरला जातो आणि ‘मती’ हा शब्द मनासाठी वापरण्यात येतो. बाबा म्हणतात, ‘मती’ म्हणजे असते आणला सरळ व बळकट करण्यासाठी व बुद्धीला प्रकाशित करण्यासाठी ‘मत’ असते. जर सर्व व्यक्तींनी त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवले आणि योग्य दिशेने विचार केले तर समाजामध्ये शांती प्रस्थापित होईल. कोणीही कोणत्याही धर्मावर टीका करू नये. तेथे केवळ एकच धर्म आहे – प्रेमाचा धर्म. तेथे केवळ एकच जात आहे- मानवजात. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
साई धर्म
सर्व धर्मसंस्थापकांचे ध्येय एकाच होते. त्यांना असे वाटत होते कि सर्वांनी चांगले वागावे, चांगले पाहावे, चांगले करावे. तसेच प्रत्येक व्यक्तीने समाजाला उपयुक्त असा घटक व्हावे. ह्यासाठी मन शुद्ध,नियंत्रित आणि योग्य दिशेने विचार करणारे असावे.
बाबा म्हणतात:
- महान संतांची धार्मिक शिकवण आपण आचरणात आणली पाहिजे.
- आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांवर प्रेम केले पाहिजे आणि आपले घर सुसंवादित जीवनाचे केंद्र बनले पाहिजे.
- परमेश्वराचे पितृत्व आणि मानवाचे बंधुत्व ह्यावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.
- आपल्या हृदयातून अहंकार, लालसा आणि असूया काढून टाका.
- परमेश्वराच्या सामर्थ्यावर आपली अढळ श्रध्दा असायला हवी आणि नेहमी सबुरी बाळगा.
आपण आपल्या धर्माची शिकवण आचरणात आणावी आणि त्या सर्व शक्तिमान परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी व प्रत्येक धर्माचा आदर करावा.
साई धर्म सर्व धर्मांना आपल्यामध्ये सामावून घेऊन त्यांच्या स्वीकार करुन त्यातील सामाईक महत्तेवर विशेष भर देतो.