होळी म्हणजे वसंत ऋतुतील उत्सव. फाल्गुन (मार्च-अप्रैल) महिन्यातील पौर्णिमेच्या ३/४ दिवस आगोदर वसंत ऋतुचे आगमन होते.
भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळीसाठी वेगवेगळे पौराणिक अर्थ आहेत. ह्यांच्यामधील भारतातील दैत्यांचा राजा हिरण्यकश्यपूचा संदर्भ सर्वाधिक प्रचलित आहे. तो अत्यंत क्रूर आणि अत्याचारी राज्यकर्ता होता. त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूचा निःसीम भक्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विष्णुची भक्ती करण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यात यश न आल्याने त्याने प्रल्हादाला जीवे मारण्याचे ठरवले. हिरण्यकश्यपूने त्याच्या सेवकांना, प्रल्हादास डोंगराच्या उंच कड्यावरुन खोल दरीत ढकलून देण्याची, हत्तीच्या पायाखाली देण्याची अशा विविध आज्ञा दिल्या परंतु प्रत्येक वेळा भगवान विष्णूंनी त्याचा बचाव केला. अखेरीस ह्या कामासाठी त्याने त्याची बहीण होलिका हिची मदत घेतली. होलिकाला वरदान मिळाले होते की तिला अग्नी भस्म करु शकणार नाही. होलिका प्रल्हादास मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसली. ह्या वेळी भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादास काहीही इजा झाली नाही. परंतु होलिका अग्निमध्ये जळून भस्मसात झाली.
अखेरीस भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार धारण करुन हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर प्रल्हादाच्या सत्वपरीक्षांचा अंत झाला. ह्यामधून दुष्ट दुर्जनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हिरण्यकश्यपूवर सच्चा भक्ताने विजय मिळविला हे दर्शवले आहे. आजही भक्त प्रल्हादाचे रक्षण आणि होलिकेचे दहन ह्यांच्या स्मरणार्थ होळी पेटवली जाते. दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांवर रंग, गुलाल उधळून उत्सव साजरा करतात. गुलाल प्रेमाचे, मैत्रीचे आणि सद्भावनेचे प्रतीक आहे. होळी हा सण वाईटावर चांगल्याने मिळवलेला विजय दर्शवण्यासाठी साजरा केला जातो.