ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम
ज्यू,ख्रिश्चन आणि इस्लाम यांची सेमेटिक धर्मांच्या समूहात गणना होते. सेमेटिक म्हणजे जे नोहाचा मुलगा शेमकडून आले आहेत. हे सर्व धर्म परमेश्वराने पाठवलेल्या प्रेषितांच्या दिव्य मार्गदर्शनावर विश्वास ठेवतात. त्यामुळे असे म्हणता येईल की, ज्यू ही ह्या धर्मांची माता, ख्रिश्चन कन्या आणि त्यानंतर इस्लामचा जन्म झाला.
मोझेस हा ज्यूंचा प्रेषित होता. प्रभू जेहोवाने त्याला ज्या दहा आज्ञा कथन केल्या आणि प्रकट केल्या त्या त्याने लोकांना सांगितल्या. कालांतराने हिब्रूंना दिव्य कायद्यांच्या गार्भितार्थाचा विसर पडला आणि त्यांनी बाह्य समारंभ आणि विधींना अधिक महत्त्व दिले. अशा परिस्थितीत ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याने सांगितले की, आतंरिक शुचिता हा धर्माचा उद्देश आहे आणि आपल्या जीवनाची मार्गक्रमणा ही प्रेमतत्त्वावर व्हायला हवी. मानवतेसाठी त्याने त्याच्या जीवनाचे बलिदान दिले. जरी येशूने मोझेसच्या मूळ शिकवणी व मुख्य गाभा पुनर्स्थापित करायचा प्रयत्न केला, तरी कालांतराने त्याच्या शिकवणीचा स्वतंत्र धर्म विकसीत झाला जो लवकरच जगातील प्रमुख धर्म झाला.
सातव्या शतकात, अरेबियामध्ये लोक अंधश्रद्धाळू झाले होते. अनेक निरनिराळ्या जमाती होत्या. ते त्यांच्या विधी व संस्कारांचे अनुसरण करीत. या जमाती सतत एकमेकांशी भांडत. अशावेळी प्रेषित मोहम्मदाचे आगमन झाले. त्याने लोकांना परमेश्वरावर हातचे न राखता, संपूर्ण समर्पण शिकवले. तो म्हणाला की त्याने ख्रिश्चन धर्माला फक्त परिपूर्ण केले, तथापि त्याच्या शिकवणींनी इस्लाम नावाच्या नवीन धर्माचा उदय झाला.
ह्या तीनही मुख्य धर्मांच्या मुख्य शिकवणी एकच आहेत. त्यांनी ‘देवाचे पालकत्व आणि मानवाचे बंधुत्व’ याला विशेष महत्त्व दिले.