सत्य हे भारतीयांसाठी वेदांनी आणि सर्व पवित्र धर्मग्रंथानी उद्घोषित केलेले आणि राष्ट्रीय बोध वाक्यातील एक मूल्य आहे. महाकाव्ये आणि धार्मिक कथापासून ते सैनिकांच्या कथांमध्ये सत्याचे काटेकोरपणे पालन करून यशस्वी झालेल्या पुरुषांची उल्लेखनीय उदाहरणे आहेत.
सत्य हे मानवजातीचे तत्त्व आहे असे वेद सांगतात. एकदा इंद्राला प्रल्हादाकडून त्याचे शील भेट म्हणून मिळाले. शीलाने प्रल्हादास सोडल्यानंतर एकामागोमाग एक कीर्ती, ऐश्वर्य,आणि पराक्रम यांच्या अधिष्ठात्री देवता त्याला सोडून गेल्या. प्रल्हादाने त्यांना जाण्यास अनुमती दिली. परंतु सत्य जेव्हा त्याला सोडून जाऊ लागले तेव्हा त्याने सत्याच्या देवतेची सोडून जाऊ नये म्हणून प्रार्थना केली. ज्या क्षणी सत्याने प्रल्हादा बरोबर राहण्याचे ठरवले तेव्हा कीर्ती ऐश्वर्य इत्यादी चे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवताही परत आल्या.